गारगोटी (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणूक जस जशी जवळ येत आहे तसतसे तिकीट वाटपाचे चित्र स्पष्ट होत आहे. माजी आमदार के.पी. पाटील गटामध्ये फुट पडल्याचे दिसून येत असून गोकुळचे विद्यमान संचालक विलास कांबळे, माजी संचालक दौलत जाधव आणि धनाजीराव देसाई यांनी सत्तधारी गटाबरोबर जाण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आज कांबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

गोकुळ निवडणुकीत विरोधी आघाडीमध्ये नेत्यांची मांदियाळी झाली आहे. बऱ्याच नेत्यांनी आपली घरातच तिकीट देण्याचे निश्चित केले असल्याचे दिसून येत आहे. यातील माजी आमदार के.पी. पाटील यांनी आपल्या कोट्यातील तिकीट चिरंजीव रणजीत पाटील यांना दिले आहे. गतवेळी पाटील यांनी आपल्या कोट्यातून कांबळे यांना उमेदवारी दिली होती. यावेळी मात्र नेत्यांच्या घरातच तिकीट देण्यात आल्याने नाराज संचालकांनी सत्ताधारी गटाची वाट धरली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचार दौऱ्यावेळी सदरच्या घडामोडी झाल्याचे समजते. के. पी. पाटील यांच्या गटातील फूट पाहूनच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी ऐनवेळी निर्णय बदलून प्रा. किसन चौगले यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

वास्तविक विरोधी गटामध्ये नेत्यांची मंदीयाळी झाल्यामुळे कार्यकर्ते तिकीटासाठी अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहे. याचाच फटका भुदरगड तालुक्यात के. पी. पाटील गटाला बसला आहे. विरोधी आघाडीतील अजून काही दुसऱ्या फळीतील नेते तिकीटासाठी सत्ताधारी गटाकडेपण चर्चा करुन आल्याचे समजते. येत्या २० तारखेला माघार आहे. त्यानंतरच तिकीटाचे चित्र स्पष्ट होणार आहे. यामुळे येत्या दोन दिवसात दोन्ही पॅनेलकडून फुटीची शक्यता नाकारता येणार नाही. आता नाराजांना जे पॅनेल समजूत घालण्यात यशस्वी होईल, त्यांनाच निवडणूक सोपी जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.