टोप (प्रतिनिधी) : सभासदांच्या हिताचा कारभार करण्यासाठी चांगले लोक उमेदवार म्हणून दिले आहेत. संस्था आणि सभासद यांच्यातील दुवा म्हणून आम्ही काम करणार आहोत. गेल्या ३६ वर्षांच्या सहकारातील अनुभवाचा उपयोग शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी करू, असे प्रतिपादन परिवर्तन पॅनेलचे प्रमुख पिलाजी पाटील यांनी केले.

टोप येथील छ. राजाराम विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

माजी संचालक विठ्ठलपंत पाटील म्हणाले की, ७ वर्षाच्या कारकिर्दीत संस्थेला कमीत कमी ७० ते ८० लाखांचा नफा व्हायला पाहिजे होता. पण संस्था आहे त्याच परिस्थितीत अजूनही आहे. कोरोना काळात साखर व डाळींची परस्पर विक्री करण्यात आली. हा गैरकारभार बाहेर येऊ नये, म्हणून आता सभासदांना साखर वाटप करण्यात येत आहेत. परिवर्तन पॅनेलची सत्ता आल्यास ज्याच्या नावावर सातबारा आहे, त्याला सभासद केले जाईल. तसेच वर्षाला डिव्हिडंट देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

संचालक विकास पाटील म्हणाले की, सत्ताधाऱ्यांचा सभासदांना डिव्हिडंट तसेच अनेक सवलती देण्यास विरोध होता. त्यांच्या या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही सत्ताधारी पॅनेलमधून बाहेर पडलो आहे. सभासद या संस्थेचे मालक असून त्यांना केंद्रस्थानी ठेऊनच परिवर्तन पॅनेल विकास करेल.

यावेळी प्रकाश पाटील, एस. एम. पाटील, दिलीप पाटील, अभिजित मुळीक, रामचंद्र पाटील, दिलीप मुळीक, मनसे तालुकाप्रमुख वैभव भोसले यांची भाषणे झाली. मुकुंद पाटील, विनोद भोसले, अमोल पाटील, शिवाजी चौगले, केरबा पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.