कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्षयरोग रुग्णांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी समाजामधील विविध घटकांचा समावेश करावा. त्याचबरोबर शासकीय योजना आणि सुविधांचा लाभ द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय टीबी फोरम आणि जिल्हा टीबी सहव्याधी समन्वय समितीची बैठक झाली. बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून क्षयरोग रुग्णांचे निदान करावे. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी बाह्य यंत्रणेमार्फत एक्सरेची सुविधा निर्माण करावी. क्षयरोग रुग्ण त्याचबरोबर एड्सच्या रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ आणि सुविधा मिळवून द्याव्यात. त्यासाठी त्यांच्या घरातील व्यक्तींमध्ये जागृती वाढवावी. जयसिंगपूर येथील शशिकला क्षयरोग आरोग्य धाम बाबतची सविस्तर माहिती द्यावी. त्याठिकाणी काही अडचणी समस्या असतील त्याबाबतही समावेश करावा.
मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमधून रुग्णांना सुविधा देण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी विशेष कक्ष स्थापन करावा. या कक्षाच्या माध्यमातून आरोग्य योजनांचा लाभ मिळवून द्यावा.
यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नावर, डॉ. हर्षदा वेदक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा शिपुरकर, वकील गौरी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, डॉ. राजेश पवार आदी उपस्थित होते.