पन्हाळा (प्रतिनिधी) : येथील गिरीस्थान नगरपरिषदकडून सन 2023-24 वर्षातील वसुलीसाठी मालमत्ता व पाणीपट्टी वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी आजपासून पन्हाळा नगरपरिषद प्रशासनाने दोन पथकांची नियुक्ती केली आहे.

पन्हाळा नगरपरिषदेकडील दोन पथकांच्या माध्यमातून शहरातील विविध भागात वाहनातून घरफाळा भरण्याबाबत आवाहन केले जात आहे. प्रसंगी थकबाकीदारावर जप्तीसह नळ जोडणी तोडण्याची कारवाई केली जाणार आहे. घरफाळा भरण्यासाठी आवाहन करण्यासह मोठ्या थकबाकीदाराकडील वसुली करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रशासनाकडून कर वसुली प्रक्रिया निश्चित केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात घरोघरी जाऊन घरफाळा भरण्याबाबत आवाहन केले जाणार आहे.

कराची रक्कम न दिल्यास नळ जोडणी तोडली जाणार आहे. पुढील टप्प्यात थकबाकीदाराचे नाव महत्त्वाच्या ठिकाणी फलकांवर झळकवले जाणार आहे. संबंधित भागात थकबाकीदाराचे नाव ध्वनिक्षेपकाद्वारे पुकारण्यात येणार आहे. याशिवाय थकीत रकमेवर २ टक्के या प्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे. या मोहिमेत अमित माने (कर प्रशासकीय अधिकारी), अवंती पाटील (सहायक कर निरीक्षक), विश्वास रामाणे (वरिष्ठ लिपिक), लिपिक नंदकुमार कांबळे, रवींद्र पारपोलकर, नेल्सन फर्नांडिस, उदय कांबळे, अमोल रासकर सहभागी झाले आहेत.

चालू आर्थिक वर्षातील घरफाळा व पाणीपट्टी अद्याप भरलेली नाही, त्यांनी तत्काळ या दोन्ही करांचा भरणा करावा. जप्तीसारखा कटू प्रसंग टाळून नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी केले आहे.