कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांचे नातू राजकुमार यशराजराजे छत्रपतीं यांच्या वाढदिवसानिमित्त आयसोलेशन येथे नव्याने स्थापन केलेल्या कोव्हीड केअर सेंटरसाठी 5 लाखांचा जनरेटर देण्याचे जाहिर केले.

न्यू पॅलेस इथे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी त्यांचे चिरंजीव राजकुमार यशराजराजे छत्रपती यांचा वाढदिवस साजरा न करता त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांसाठी 1 हजार सॅनिटायझर बॉटल्स, 1 हजार मास्क, 500 फेसशिल्ड, 250 पीपीई किट आणि 50 गाऊन  महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी  यांच्याकडे आज सुपूर्द केले.

यावेळी कोल्हापूरच्या राजे घराण्याने क्षणाचाही विचार न करता महापालिकेने केलेल्या आवाहनास त्वरीत प्रतिसाद देऊन तात्काळ 5 लाखांचा जनरेटर देण्याचे मान्य केल्याबददल महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे आभार मानले.

यावेळी श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांनी कोल्हापूर शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्याबाबत महापालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणखीन काही मदत आवश्यक असल्यास तात्काळ उपलबध करुन देऊ, अशी ग्वाही दिली.

यावेळी माजी आ. मालोजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती, महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक अर्जुन माने, राजाराम गायकवाड, रत्नेश शिरोळकर, उदयोजक तेज घाटगे, प्रविण इंगळे, प्रविणसिंह घाटगे, आशपाक आजरेकर आदि मान्यवर उपस्थित होते.