नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नाल्ट या दोन कुटुंबामध्ये जोरदार स्पर्धा सुरू असून, शुक्रवारी गौतम अदानी यांनी अर्नाल्टला मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. कधी अदानी पुढे जात आहे, तर कधी बर्नार्ड अर्नाल्ट अशी जोरदार स्पर्धा या दोन्ही उद्योगपतीमध्ये पाहायला मिळत आहे. गौतम अदानी आणि एलन मस्क या दोन्ही उद्योगपतींचा जगातील टॉप-१० श्रीमंतांच्या यादीमध्ये समावेश आहे.

भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती १५४.७ अब्ज डॉलर इतकी आहे तर बर्नार्ड अर्नाल्ट यांची संपत्तीही १५३.८ अब्ज डॉलर इतकी आहे. पहिल्या स्थानावर असलेले जगातील सर्वात श्रीमंत एलन मस्क यांची संपत्ती २७३.५ अब्ज डॉलर इतकी आहे,  तर मागच्या महिन्यांमध्ये मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स यांना गौतम अदानी यांनी मागे टाकले होते. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनाही गौतम अदानी यांनी मागे टाकले होते. एप्रिल २०२२ मध्ये पहिल्यांदा अदानी समूहाची यांची एकूण संपत्ती १०० अब्ज डॉलरच्या पुढे गेली होती.

यावेळी अब्जाधीशांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवण्यासाठी अदानी एंटरप्रायजेस कंपन्याच्या शेअर्सचे मोठे योगदान आहे, तर सुरुवातीच्या व्यापारामध्ये बीएसईवर अदानी एंटरप्रायजेसचे शेअर्स ३८६५.६० रुपये प्रति शेअरवर पोहोचले. त्यानंतर अदानी एंटरप्रायजेस कंपनीने नवी उंची गाठून एलआयसी आणि आयटीसी कंपन्यांना मागे टाकण्यात यश मिळाले आहे.