कोल्हापूर (प्रतिनिधी) : गार्डन्स क्लब कोल्हापूर आणि राजर्षी शाहू छत्रपती महाराज कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ५१ वे पुष्पप्रदर्शन कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात भरवण्यात आले. हे पुष्प प्रदर्शन पर्यावरणपूरक असल्याचे प्रतिपादन पालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून श्रीमती शांतादेवी पाटील, अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे कृषी सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम होले, डॉ. संग्राम धुमाळ उपस्थित होते.

अध्यक्षा कल्पना सावंत यांनी, महापालिका एक पाऊल पुढे येत आहे तर गार्डन्स क्लब मागे हटणार नाही. महापालिका उद्यानांना नवीन उभारी देण्यासाठी आणि रोज गार्डनसाठी आम्ही नक्कीच सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

विविध प्रकारच्या फुलांच्या साधारण २० विभागातील ५५ स्पर्धामध्ये २०० स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये बोन्साय, झेंडू, जिरेनियम, फुलांची व पाकळ्यांची रांगोळी, क्रोटॉन, कुंडीतील रोपे,अशा विविध स्पर्धेतील रचना सर्वांना पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या. तर दुपारी शॉर्टफिल्म स्पर्धेच्या निवड झालेल्या फिल्म दाखविण्यात आल्या. तर संध्याकाळी फ्लॉवर शोचे मुख्य आकर्षण असलेला फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांचा ‘बोटॅनिक फॅशन शो’ आणि ‘मॅनी क्वीन डिस्प्ले स्पर्धा सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली.

यावेळी उपाध्यक्ष शशिकांत कदम,सचिव पल्लवी कुलकर्णी, डॉ. धनश्री पाटील, शैला निकम, वर्षा वायचळ, सुभाषचंद्र अथणे, अशोक डुणुंग,  संगीता कोकितकर, दीपा भिंगार्डे आदि उपस्थित होते.