मुंबई (प्रतिनिधी) : सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे म्हणून सरकारमधील नेते अशी बेताल वक्तव्य करत आहेत, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. मविआच्या काळात एकही प्रकल्प गेला नाही, आताच प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. खमकेपणाणे राज्यासाठी काम केले तर राज्याचा विकास होतो, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सांगितले पाहिजे की, असे वक्तव्य करु नये. माझ्याकडून एकदाच चुकीने वक्तव्य झाले ते नको व्हायला हवे होते, पण त्यानंतर माझ्याकडून चुकीचे वक्तव्य झाले नाही, पण राज्यात रोजच नवे वादग्रस्त वक्तव्य केले जात आहे, असा आरोपही अजित पवारांनी केला आहे.

आम्ही सत्तेत होतो पण कधीच विरोधकांना असा त्रास दिला नाही. आमच्या जवळच्या माणूस चुकला तर आम्ही कारवाई केली असे सांगून अजित पवारांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. तरी एसटी महामंडळाच्या लोकांनी मविआच्या काळात आंदोलन केले. आता तुमचे सरकार आले आहे, आता का एसटीच्या कर्मचाऱ्यांना सरकारमध्ये घेतले नाही, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला.