कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील आयसोलेशन हॉस्पिटलसह दहा कुटुंब कल्याण केंद्राच्या ठिकाणी शहरातील नागरिकांचे मोफत स्वॅब घेण्याची सुविधा करण्यात आली आहे.

शहरातील लोकांची कोरोना चाचणी घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. आतापर्यंत सीपीआर आणि आयसोलेशन हॉस्पिटल येथेच मोफत स्वॅबची सुविधा उपलब्ध केली होती. शहरवासियांची मागणी आणि रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन महापालिकेने आता सीपीआर आणि आयसोलेशन पाठोपाठ शहरातील दहा कुटुंब कल्याण केंद्राच्या ठिकाणी मोफत स्वॅब घेण्याचे नियोजन केले आहे.

मोफत स्वॅब घेण्यासाठी शहरात निश्चित केलेल्या दहा कुटुंब कल्याण केंद्रांमध्ये कुटुंब कल्याण केंद्र फिरंगाई हॉस्पिटल, कुटुंब कल्याण केंद्र राजारामपुरी, कुटुंब कल्याण केंद्र कसबा बावडा, कुटुंब कल्याण केंद्र महाडिक माळ, कुटुंब कल्याण केंद्र फुलेवाडी, कुटुंब कल्याण केंद्र सदर बाजार, कुटुंब कल्याण केंद्र सिद्धार्थनगर, कुटुंब कल्याण केंद्र मोरेमाने नगर यांचा समावेश आहे.

शहरातील सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आणि पंचगंगा हॉस्पिटल ही कुटुंब कल्याण केंद्रे केवळ गरोदर मातांसाठी राखून ठेवण्यात आली आहे. तरी शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या १० कुटुंब कल्याण केंद्रांवरील मोफत स्वॅब तपासणी उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.