पुणे (प्रतिनिधी) : वादग्रस्त विधाने करून नेहमी चर्चेत राहणारे भाजपचे माजी खासदार संजय काकडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मेव्हण्याला  गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात येणार आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्यांच्या घरी आणि कार्यालयात त्यांना अटक करण्यासाठी गेले होते. परंतु ते त्या ठिकाणी सापडले नाहीत.

संजय काकडे यांनी स्वतःच्या मेव्हण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यामध्ये काकडे दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी संजय काकडे आणि त्यांची पत्नी उषा काकडे यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. परंतु हे दोघेही गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे. काकडे यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असून  त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे.