पणजी ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुक 2024 साठी भाजपाने 24 मार्च रोजी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत अनेक प्रसिद्ध नावांचा समावेश आहे. ज्याच्यामध्ये कंगना रनौत, अरुण गोविल या सिनेकलाकारांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे गोव्यात पहिल्यांदाच भाजपने एका महिलेला उमेदवारी दिली आहे. दक्षिण गोवा मतदारसंघातून गोव्यातील प्रमुख व्यावसायिक कुटुंबातील सदस्य उद्योजिका पल्लवी डेम्पो यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दक्षिण गोव्या मधून भाजपने पल्लवी धेंपे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात दक्षिण गोव्यातून महिला उमेदवार म्हणून भाजपने पहिल्यांदाच एखाद्या महिलेला संधी दिली आहे. याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावत दक्षिण गोव्याचे उमेदवार पल्लवी धेंपे आणि उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांचे स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत, आमदार डॉ. दिव्या राणे, स्नेहा भागवत यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.रोज नव्या चेहऱ्यांची नावे प्रसिद्ध केली जात होती. मात्र नाव कुणाचे असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. काल पल्लवी धेंपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, माध्यमांमध्ये ज्या-ज्या महिलांची नावे चर्चेत होती, त्या सर्व पल्लवी धेंपे यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत, असे त्यांनी सांगितले. आम्ही त्यांना मोठ्या मताधिक्क्याने जिंकून आणणार हे निश्चित असल्याचं म्हटलं आहे.