कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक उद्धिष्ठ २ हजार ४८० कोटीचे आहे. यापैकी ३१ ऑगस्ट २०२० अखेर १ हजार ८९२ कोटी इतकी उद्दिष्टपूर्ती करून राज्यात कोल्हापूर प्रथम स्थानावर राहिला. याबद्दल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक, सर्व राष्ट्रियकृत, ग्रामीण, खासगी, सहकारी बँकांचे अभिनंदन केले. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा स्वत:हून दुप्पट उद्दिष्ट घेऊन यापुढे सर्वांनी चांगले काम करून जिल्हा प्रथमस्थानी ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक गुगलमिटच्या सहाय्याने घेण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी देसाई यांनी सर्वांशी संवाद साधून आढावा घेतला. ते म्हणाले, प्रलंबित असणाऱ्या कामकाजाबद्दल सर्वांनी नियोजन करून त्याचा आराखडा पाठवावा. पुढच्या सहा महिन्यात यावर काम करावे. बीएलबीसीच्या बैठकीत आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रीत करावे. बँकांनी विविध योजनांच्या कर्ज वाटपाची यादी बैठकीत सादर करावी. बँकेत येणाऱ्या ग्राहकासाठी आपण सेवा देत आहोत. ही आस्था ठेवून ग्राहकांना चांगली वागणूक देवून सुसंवाद ठेवावा. याविषयी क्षेत्रीय स्तरावर प्रबोधन करण्यात यावे. राष्ट्रीय बँकांविषयी तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
आमदार प्रकाश आबिटकर यांनीही सूचना मांडल्या. ते म्हणाले, बीएलबीसीमध्ये स्थानिक लोकप्रतिनीधींना निमंत्रीत करावे. ग्राहकांना राष्ट्रीय बँकांनी सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी. शासनाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ गरजूंना देवून नवे उद्योजक तयार करावेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, सर्व बँकांनी तालुकानिहाय उद्दिष्टांची पूर्तता करून अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा. त्याचा आढावा मुख्यालयाने आठवड्याला घ्यावा. ज्या बँकांचा सीडी रेशो ६० टक्क्याच्या खाली आहे त्यांनी हा रेशो सुधारावा.
अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहूल माने यांनी सुरूवातीला आढावा दिला. ते म्हणाले, ३० जून २०२० पर्यंत पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत १० लाख ७८ हजार ३३ खाती उघडण्यात आली आहेत. ७ लाख ७२ हजार १३६ खात्यामध्ये रूपे कार्ड प्रदान करण्यात आले आहे. प्रधानमंत्री जीवनसुरक्षा विमा योजनेतंर्गत ४ लाख ७४ हजार ७०० खाती उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेतंर्गत १ लाख ८४ हजार ३०८ खाती उघडण्यात आली आहेत. अटल विमा योजनेतंर्गत ५८ हजार ३४७ खाती उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत जून २०२० अखेर ७ हजार ८४२ लोकांना ११३.१२९ कोटीचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक मनोज मून, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक यांच्यासह सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सहभागी झाले होते.