कतार (वृत्तसंस्था) : रविवारपासून कतार येथे सुरू होणाऱ्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तब्बल ३२ संघांचा सहभाग असून, जगभरातील फुटबॉल रसिकांना आघाडीच्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळेल. गतविजेत्या फ्रान्सचा जेतेपद आपल्याकडेच राखण्याचा मानस असला, तरी अन्य संघ त्यांच्या वर्चस्वाला धक्का लावत विश्वचषकावर आपले नाव कोरण्याचा प्रयत्न करतील.

चार वर्षांपूर्वी रशियात झालेल्या ‘फिफा’ विश्वचषकाचे फ्रान्सने जेतेपद पटकावले होते. यंदा त्यांना जेतेपद आपल्याकडेच राखण्याची संधी असेल. फ्रान्सच्या संघाला गेल्या काही काळात सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही. गेल्या वर्षी ‘युरो’ अजिंक्यपद स्पर्धेत फ्रान्सचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले होते. त्यातच एन्गोलो कान्टे आणि पॉल पोग्बा हे फ्रान्सचे प्रमुख मध्यरक्षक दुखापतींमुळे यंदाच्या विश्वचषकाला मुकणार आहे. त्यामुळे अन्य खेळाडूंवर आपला खेळ उंचावण्याची जबाबदारी असेल. फ्रान्सच्या संघात किलियान एम्बापे, करीम बेन्झिमा, ऑलिव्हिएर जिरूड आणि अ‍ॅन्टोन ग्रीझमन असे दर्जेदार आघाडीपटू आहे. त्यांच्या मध्यरक्षकांच्या गाठीशी आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा फारसा अनुभव नाही.

सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेसीची ही अखेरची विश्वचषक स्पर्धा असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्या कर्णधाराला विश्वविजयासह निरोप देण्याचा अर्जेटिनाच्या संघाचा प्रयत्न असेल. मेसीचा समावेश असतानाही अर्जेटिनाला अनेक वर्षे जागतिक स्पर्धाच्या जेतेपदाने हुलकावणी दिली होती. मात्र, गेल्या वर्षी अर्जेटिनाने ‘कोपा अमेरिका’ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यामुळे अर्जेटिनाच्या संघाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्यातच अर्जेटिनाचा संघ गेले ३६ सामने अपराजित आहे. आता हीच लय कायम राखून तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे अर्जेटिनाचे लक्ष्य असेल.

‘फिफा’ विश्वचषकासाठी ब्राझीलचा संघ दावेदार नाही, असे आजवर घडलेले नाही. यंदाही ब्राझीलचा संघ जेतेपदाच्या शर्यतीत असेल. ब्राझीलचा संघ सध्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असून, सर्वाधिक (पाच) विश्वविजेतेपदांचा विक्रमही त्यांच्याच नावे आहे. ब्राझीलच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. विश्वचषकाच्या पात्रता फेरीत ब्राझीलचा संघ अपराजित राहिला. त्यामुळे विश्वचषकात ब्राझीलला नमवणे अन्य संघांना सोपे जाणार नाही. ब्राझीलची भिस्त प्रामुख्याने तारांकित आघाडीपटू नेयमारवर असेल. १२१ आंतरराष्ट्रीय सामन्यांत नेयमारच्या नावे ७५ गोल आहेत.