पन्हाळा (प्रतिनिधी) : मुलकीपड जमिनी कसण्यासाठी ताब्यात मिळाव्यात या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज
(मंगळवार) जनसुराज्यचे जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे यांचे नेतृत्वाखाली पन्हाळा तहसीलवर तिरडी मोर्चा काढला. या वेळी तहसीलदार रमेश शेंडगे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पन्हाळा तालुक्यातील पिसात्री, कोलीक, मानवाड, पोंबरे आदी गावांमध्ये छ. शाहू महाराजांनी निरनिराळ्या कारणांसाठी तेथील शेतकऱ्यांना जमिनी दिल्या होत्या. या जमिनी ७ बाय बारा कोष्टकी मुलकीपड म्हणून राहिल्या. त्या शेतकऱ्यांचे नावे करून मिळाव्यात याकडे सरकारचे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढल्याचे शंकर कांबळे यांनी सांगितले. या मोर्चात सुमारे शंभर शेतकरी सामील झाले होते.

तहसीलदार रमेश शेंडगे यांनी निवेदन स्वीकारताना सांगीतले की, या संदर्भातील जुने पुरावे शोधून जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती योग्य निर्णय घेईल. या तिरडी मोर्चासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.