कोलोंबो (वृत्तसंस्था) श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रानिल विक्रमसिंघे यांची निवड झाली आहे. राष्ट्राध्यपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे साजिथ प्रेमदासा यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर झालेल्या काट्याच्या लढाईत रानिल विक्रमसिंघे यांनी अखेर बाजी मारली. विक्रमसिंघे यांनी डलास अलाहाप्पेरुमा यांचा दारुण पराभव केला.

तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पलायन केल्यानंतर रानिव विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष करण्यात आले होते, तर त्याचे प्रतिस्पर्धी आणि विरोधी पक्ष नेते साजिथ प्रेमदासा यांनी स्वत:ला राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले होते; परंतु निवडणुकीच्या एक दिवस आधीच साजिथ प्रेमदासा यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर रानिल विक्रमसिंघे आणि डलास अलाहाप्पेरुमा यांच्यात थेट लढत झाली.

आता नवे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे हे आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करतात आणि जनतेला कसा दिलासा देतात, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

७३ वर्षीय रानिल सहा वेळा पंतप्रधान होते. राजपक्षेंचा पक्ष एसएलपीपीच्या खासदारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला पूर्ण पाठिंबा दिला. श्रीलंकेत आंदोलन करणारे लोक त्यांना राजपक्षे यांचे साथीदार मानतात. रानिल यांनी कार्यवाहक अध्यक्ष म्हणून श्रीलंकेत आणीबाणी लागू केली. त्यांना हटवण्याचे अधिकार पोलीस आणि सुरक्षा दलांना देण्यात आले होते. आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसल्यानंतर रानिल यांनी हे पाऊल उचलले. रानिल यांच्या विरोधात निवडणूक पराभूत झालेले दुलस अल्हप्परुमा हे माजी शिक्षण मंत्री व पत्रकारही होते.