नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तब्बल सात दशकांनंतर म्हणजे सत्तर वर्षांनंतर भारतीय भूमीत चित्ते परतले आहेत. नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. आठ चित्त्यांमध्ये ४ मादी आणि ३ नर आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडले.

कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. कुनो नॅशनल पार्क हे ७४८ चौरस किलोमीटरवर पसरलेले संरक्षित क्षेत्र आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी १२ किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येईल.

भारतात आणलेल्या चित्त्यांसमोर काही आव्हाने असतील. चित्त्यांना भारतातील वातावरणाशी जुळवून घ्यावे लागेल. चित्त्यांना येथील प्राण्यांची शिकार करावी लागेल. भारतात आढळणारे हरीण आफ्रिकेत आढळत नाही. त्यामुळे या प्राण्याची शिकार करणे चित्त्यांना जमेल का, हा प्रश्न आहे. निरीक्षणानंतर चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात येईल.

येथे पंतप्रधानांसाठी १० फूट उंच मंच बांधण्यात आले होते. या मंचाखाली पिंजऱ्यात चित्ते होते. पंतप्रधानांनी लीव्हरद्वारे बॉक्स उघडला. चित्ते बाहेर येताच अनोळखी जंगलात थोडे थबकलेही. इकडे तिकडे नजर फिरवली आणि चालू लागले. लांबच्या प्रवासाचा थकवा स्पष्ट दिसत होता. चित्ते बाहेर येताच पीएम मोदींनी टाळ्या वाजवून चित्त्यांचे  स्वागत केले. मोदींनी काही फोटोही क्लिक केले. ५ मीटर चालत मोदी स्टेजवर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान होते. चित्ता मित्र टीमच्या सदस्यांशीही त्यांनी संवाद साधला.