कळे (प्रतिनिधी) : धामणीखोऱ्यातील वेतवडे (ता.पन्हाळा) येथे दरवर्षी अतिशय उत्साहात दसरा सण साजरा केला जातो. पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील बलुतेदारांनी दसरा आणि विजयादशमीचा सोहळा शासकीय नियमांचे पालन करीत पार पाडला.
वेतवडे येथे दरवर्षी दसऱ्यामध्ये घटस्थापना, नवरातकरी बसवणे, जागर, नदीवरील पालखी सोहळा, देवाला हळद आणणे आदी कार्यक्रम केले जातात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सवावर कोरोना दक्षता कमिटीने अतिशय साध्या पध्दतीने आणि कमी लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला. मंदिरात घटस्थापना केल्यापासून सर्व पारंपरिक विधी अतिशय साध्या पध्दतीने पार पडले.
त्यासाठी पुजारी सरदार गुरव, बाळु सुतार, प्रकाश कुंभार, संतोष सोनार, संजय दळवी, एम. डी. पाटील आदींनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.