सोलापूर (प्रतिनिधी) : अष्टविनायक गणपती पैकी सातवा गणपती म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आणि सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या तळे हिप्परगा येथील मशरूम गणपतीचा सोन्याचा कळस बुधवारी सकाळी चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या कळसाला २८ तोळे सोन्याच्या मुलामा दिलेला होता. सुमारे २५ किलो वजनाचा हा कळस असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे सहा वर्षांनंतर पुन्हा दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे.

शहराच्या लगत असलेल्या तळे हिप्परगा येथील मशरूम गणपती शहराचे भूषण मानले जाते. मंगळवारी (दि. ३० ऑगस्ट) रात्री पुजाऱ्याने रोजची पूजा आटोपून मंदिर बंद केले होते. पुजारी संजय पतंगे हे पहाटे चारच्या सुमारास मंदिरात येण्यापूर्वी सवयीप्रमाणे आधी कळसाचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी कळसाकडे बघितले; मात्र कळस दिसला नाही. यामुळे कळस चोरला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी तातडीने भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांना कल्पना दिली.

पुजारी संजय निंबाळकर यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. सहा वर्षांपूर्वीही ६ जुलै २०१६ साली मंदिराचा कळस चोरीला गेला होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी तातडीने तपास करून २४ तासांत तो कळस शोधून मंदिर व्यवस्थापनाच्या ताब्यात दिला होता.