कोल्हापूर (प्रतिनिधी) : मंत्र्यांच्या दौऱ्यात मोठमोठ्या शासकीय कार्यक्रमात मिरवणारे अधिकारी समाजाने बघितलेत; मात्र समाजात ग्राऊंडवर उतरून काम करणारे अधिकारी क्वचित दिसतात. कोल्हापूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आहेतच, शिवाय संवेदनशील असणाऱ्या चव्हाण यांच्या अनोख्या कामाचे दर्शन नुकतेच धनगरवाड्यास झाले.

पोलिओमुळे एका पायाने अधू असूनही चव्हाण यांनी आजरा तालुक्यातील हरपवडे पैकी धनगरवाड्याला धो-धो पावसात कड्याकपारीतून जाऊन भेट दिली. तिथल्या नागरिकांच्या वेदना जाणून घेतल्या. येथील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. त्यामुळे सीईओ संजयसिंह चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आजरा तालुक्यातील हरपवडे पैकी धनगरवाडा अजूनही मूळ समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. ना वीज, ना दवाखाना, ना रस्ता अशा दयनीय अवस्थेला येथील नागरिकांना सामोरे जावे लागते. मुसळधार पावसात ओढ्या-नाल्यातून कड्याकपारीतून वाट काढत लसीकरण करण्यासाठी जाणाऱ्या आरोग्य सेविका, आशा वर्कर्संचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याची बातमी लाईव्ह मराठीने दाखवली आणि याची दखल घेऊन जि.प.चे सीईओ  संजयसिंह चव्हाण यांनी पावसाची तमा न पाळगता, कनिष्ठ अधिकाऱ्यांना तेथे न पाठवता आणि पायाची चिंता न करता स्वतः आजारी असताना आपल्या अधिकाऱ्यांसोबत याच वाटेने धनगरवाड्यात पोहोचले.

येथे प्रवेश करताच त्यांना एका शेतकऱ्याची म्हैस मरण पावलेली निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. येथील नागरिकांनी आपल्या वेदना चव्हाण यांच्या समोर मांडल्या. यावेळी खरच धनगरवाड्याच्या समस्या गंभीर असून, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही संजयसिंह चव्हाण यांनी दिली. आरोग्य सेविका, आशा वर्कर्संनी आपल्या कामाची दखल घेतल्याने समाधान व्यक्त केले. त्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या भेटीने येथील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.