मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाने सर्वच वर्गातील व्यक्तींना हैराण केले आहे. सामान्य नागरिकांसोबत अनेक नेतेमंडळीनाही कोरोनाने ग्रासले आहे. यातच आता मागील काही दिवसांपासून बिहार-महाराष्ट्र दौऱ्यांमध्ये व्यस्त असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनादेखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. फडणवीस हे मागील काही महिन्यांपासून दौऱ्यावर आहेत. त्याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारीही त्यांच्यावर असल्याने ते सातत्याने फिरतीवर होते. आज (शनिवार) त्यांनी ट्विटद्वारे कोरोनाबाधित असल्याची माहिती दिली.

ट्विटमध्ये ते म्हणाले, ‘लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी,’ असे आवाहनही फडणवीस यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींना केले आहे.