कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिका आरोग्य कीटकनाशक विभागामार्फत आजपासून (शनिवार) ४ नोव्हेंबर अखेर संपूर्ण शहरात डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम नऊ दिवसांमध्ये ८१ प्रभागात डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीमेमध्ये डास अळी सर्वेक्षण औषध फवारणी आणि धूर फवारणी, तसेच टायर जप्ती मोहीम आणि शौचालयाच्या वेंट पाईपला जाळी बांधण्याचे काम कोल्हापूर महानगरपालिकेने हाती घेतले आहे.
तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे आणि टायर्स नारळाच्या करवंट्या फुटके डबे जेणेकरून पाणी साठणार नाही, अशा वस्तूंचा त्वरित नायनाट करून डेंग्यू, चिकनगुनिया अशा जीवघेण्या आजार नियंत्रित ठेवणे शक्य आहे.
या सर्वेक्षण टीममध्ये ५४ कर्मचारी कीटकनाशक विभागाचे आणि ५४ कर्मचारी आरोग्य विभाग यांच्याकडून उपलब्ध करून एका टीममध्ये १२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अशा ९ टीम्स केल्या असून, नऊ दिवसांमध्ये एकूण ८१ प्रभाग पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान आजच्या मोहिमेत ४८७४ घरे तपासण्यात आली असून, ३४६ दूषित घरे सापडली आहेत. त्याठिकाणी अळीनाशक टेमीफॉस हे द्रावण टाकण्यात आले.