कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथील बाजारावर अवलंबून असणाऱ्या व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. त्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांनी आठवडी बाजार सुरू करण्याबाबतचे निवेदन मंडळ अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायतीला दिले. यावेळी तलाठी संदीप कांबळे, ग्रामविकास अधिकारी आर. आर. पाटील आणि कोतवाल पंढरीनाथ सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारले.
सुमारे पन्नास गावांशी कळे बाजारपेठ जोडलेली आहे. व्यापारीदृष्ट्या मध्यवर्ती केंद्र आहे. दर शनिवारी येथे आठवडी बाजार भरत असतो. पंरतु, कोरोनामुळे मार्चपासून बाजार बंद राहिला आहे. सुमारे २५० च्या वर व्यापारी आणि आस्थापनाची दुकाने आहेत. या बाजारावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. त्यांच्या कुटुंबाच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय आठवडी बाजार बंद असल्याने कांही जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत.
लॉकडाऊनमुळे आर्थिक आवक खुंटलेल्या सामान्य नागरिकांचीही कुचंबणा होत आहे. त्यामुळे आठवडी बाजार सुरू होणे आवश्यक आहे. तसेच बाजारावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळावे. अशी मागणी कळे व्यापारी संघटनेने केली आहे.
यावेळी अध्यक्ष रामचंद्र झुरे, उपाध्यक्ष सुनील डबीरे, कार्याध्यक्ष सुरेश पोवार,सचिव विनायक झुरे, अमर मिठारी, सागर हिंगे, शंकर झुरे, राजेंद्र डबीरे, अमर पाटणे, प्रवीण व्हण्डराव, रोहित नकाते, सुरेश मिठारी,कृष्णात भाळवणे, अनिल भुसके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.