कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून नागरिकांचे आर्थिक  गणित विस्कळीत झाल्याने राज्य शासनाने शालेय शैक्षणिक फीमध्ये १५ टक्के माफीचे आदेश काढले आहेत. परंतु, याची अंमलबजावणी प्रत्यक्षात कोणत्याही शाळेमध्ये होत नसल्याने पालकांची आर्थिक कुचबंणा होत आहे. तरी तत्काळ या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी आज (शुक्रवार) कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली.

याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांना देण्यात आले. दरम्यान याप्रकरणी कृती समितीने प्रशासनाला धारेवर धरत १०० टक्के फीसाठी तगादा लावणाऱ्या शाळेवर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.

दरम्यान ज्या शाळा १०० टक्के शैक्षणिक फीची मागणी करुन पालक व विद्यार्थ्यांना वेठीस धरतील. अशा पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांनी केले.

यावेळी अशोक पवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत सूर्यवंशी, अनिल पाटील, राजू मालेकर, विलास भोंगाळे, रमाकांत अँग्रे, विनोद डूणंग, राजेश वरक आदी उपस्थित होते.