कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना’सन २०२२-२३ करिता अर्ज करण्यास ७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी  माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे.

देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजने’साठी २०२२-२३ करिता विद्यार्थ्यांकडून जाहिरातीव्दारे अर्ज मागविण्यात आले होते. शैक्षणिक संस्थांमधील २०२२-२३ मधील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याने मागविण्यात आलेल्या अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. योजनेकरिता अर्जाचा नमुना, अटी व शर्ती शासन निर्णय व अधिक माहितीसाठी  www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार या लिंकला पाहावी. ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचे’ अर्ज आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय,३ चर्चरोड, पुणे- १ यांच्याकडे दि. ७ डिसेंबर रोजी सायं. ६.१५ वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहनही लोंढे यांनी केले आहे.