नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतासाठी कोरोना लसीसंबंधी दिलासादायक बातमी मिळणार आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत देशात ऑक्सफर्डची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या लसीची उपलब्धता सर्वप्रथम डॉक्टर्स, नर्स, पोलीस तसेच कोरोनायोध्दा म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकार पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला कोरोनाच्या लसीच्या वापरासंबंधी आपत्कालीन मंजुरी देण्याची शक्यता आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या डिसेंबरच्या अखेरपर्यंत केंद्र सरकारकडे आपत्कालीन मंजुरीसाठी अर्ज करतील. कंपनीने याआधीच तसे स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या लसीच्या खरेदीसंबंधी केंद्र सरकार लस निर्मीती कंपन्यांशी अंतिम चर्चा करत आहे. ऑक्सफर्ड लसीची बाजारपेठेतील किंमत ५०० ते ६०० रुपये असेल. भारतीय लोकसंख्या लक्षात घेता केंद्र सरकार या लसीची खरेदी मोठ्या प्रमाणात करणार असल्याने सरकारला ही लस २२५ ते ३०० रुपयाला उपलब्ध होईल.

सीरम इन्स्टिट्यूटने ब्रिटनमध्ये त्यांच्या लसीच्या प्रभावासंबंधी माहिती जमा केल्यानंतर भारतात त्याच्या आपत्कालीन वापरासंबंधी विनंती केल्यास केंद्र सरकार त्याला मंजुरी देईल. भारत बायोटेकच्या बाबतीतही केंद्र सरकार असा विचार करु शकते. असे घडले तर मार्च अखेरपर्यंत भारतात एकापेक्षा जास्त कोरोनाच्या लसींची उपलब्धता होईल.