कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूधसंघातील शिरोळ तालुक्यातील बुबनाळ येथील ठरावधारक मतदार राजाराम शिवाप्पा हेगाण्णा यांचा मंगळवारी रात्री उशीरा कोरोनामुळे रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. गोकुळ दूधसंघातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या हा दुसरा ठरावधारक मतदार आहे.

राजाराम हेगाण्णा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर जयसिंगपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती अत्यावस्थ होत गेली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. गोकुळ दूधसंघातील ठरावधारक मतदार असलेले हेगाण्णा यांच्या मृत्यूमुळे गोकुळ परिवारात दुःखाची आणि चितेंची छाया पसरली आहे. गोकुळ दुधसंघासाठी असलेल्या ३६५० मतदारांपैकी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने ही संख्या आता ३६४८ इतकी झाली आहे.

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळची निवडणूक स्थगित व्हावी, या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याच्यावर २६ एप्रिलरोजी सुनावणी होणार आहे. याचा उल्लेख याचिकाकर्ते आपल्या म्हणण्यामध्ये करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.