कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना आ. सतेज पाटील यांनी केल्या आहेत. उद्योजकांच्या विविध समस्या, प्रलंबित प्रश्न यासंदर्भात कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य पातळीवरील समस्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. तसेच तीन महिन्यांनी आढावा बैठक घेण्याच्या सूचनाही आ. पाटील यांनी दिल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगांव, कागल एमआयडीसी, इचलकरंजी, जयसिंगपूर, हातकणंगले आणि शिरोळ येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या उद्योजकांना शासन स्तरावर काही अडचणींना सामोरे जावे लागते. याबाबत औद्योगिक संघटना उद्योजक, आमदार व शासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक  उद्यमनगर येथे पार पडली. आ. सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये उद्योजकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आ. जयश्री जाधव, आ. ऋतुराज पाटील, इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष हर्षद दलाल, आयआयएफचे चेअरमन सचिन शिरगावकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये औद्योगिक क्षेत्रातील एफएसआय, एल. बी.टी., बी टेन्यूअर, रुपांतरित कर, ग्रामपंचायत कर, भूमिगत वीज वाहिन्या, कामगारांसाठी असलेली ई एस.आय. हॉस्पिटल सुविधा, पर्यावरण विषयक बाबी आणि उद्योग क्षेत्रातील अडचणी अशा विविध विषयावर चर्चा करून उद्योजकांचे प्रश्न समजावून घेण्यात आलेत. या प्रत्येक विषयावर या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत क्षेत्रातील उद्योजकाकडून आकारण्यात येणाऱ्या करामध्ये सुसूत्रता आणण्याच्या सूचनाही या बैठकीमध्ये आ. सतेज पाटील यांनी केल्या. विकासवाडी येथील २३५ हेक्टर जमीन नवीन एमआयडीसीसाठी प्रस्तावित असून, यामध्ये लघु उद्योगांना प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी मांडली.

कोल्हापूर इंजनिअरिंग असोसिएशन अध्यक्ष हर्षद दलाल यांनी, शिवाजी उद्यमनगर, वाय.पी. पोवारनगर व पांजरपोळ येथील एफएसआय सध्या १.१० आहे तो ३ करावा, महापालिका क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीमधील कचरा उठाव हा दिवसा न करता रात्रीच्या वेळी करावा, यासह इतर विविध मागण्या बैठकीमध्ये केल्या. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी, उद्योजकांच्या परवाना नोंदणीचा, तर उद्योजक सचिन शिरगावकर यांनी औद्योगिक क्षेत्रातील वीज वाहिन्या भूमीगत करण्याबरोबरच उद्योजकांच्या विजेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला.

या बैठकीला उद्योजक संजय पेंडसे, मोहन पंडितराव, दीपक पाटील, सचिन शिरगावकर, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, प्रदीपभाई कापडिया, संगीता नलवडे, हिंदुराव कामते, अरुण जाधव, तहसीलदार शीतल मुळे भामरे, शिल्पा ठोकडे, शरद पाटील, कल्पना ढवळे, राहुल भिंगारे, मंजुषा चव्हाण, प्रमोद माने, अंकुर कावळे, शिल्पा दरेकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आर. एस. महाजन आदी उपस्थित होते.