कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सुळे-आकुर्डे धरणाची वर्षभरापासून अतिशय बिकट अवस्था झाली होती. त्याची दखल घेत पाटबंधारे विभागाने या धरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने धरणाच्या पिलर्सची चांगल्याप्रकारे दुरुस्ती करण्यात आली आहे. पाटबंधारे विभाग व ठेकेदाराच्या कामाविषयी शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. 

धामणी खोऱ्यातील दहा ते बारा गावांना जोडणारे धरण म्हणून सुळे-आकुर्डे धरणास ओळखले जाते. या धरणास सुमारे ५० वर्षे झाली आहेत. त्यामुळे हे धरण कमकुवत झाले आहे. गतवर्षी येथील धरणाचे काही पिल्लर ढासळल्याने अवजड वाहनास वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे ऊस वाहतुकीसह इतर वाहन धारकांना गोठे-परखंदळे-कळे मार्गे प्रवास करत त्यांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता.

यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे पाटबंधारे विभागाने येथे तब्बल २५ लाखांचा निधी दिला होता. हे काम एम्पायर इन्फ्रास्ट्रक्चर कोल्हापूरचे ठेकेदार पृथ्वीराज पाटील यांनी अतिशय मजबूत व टिकाऊ बांधकाम केले असून, सध्या धरणाला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले.

सुळे-आकुर्डे परिसरातील शेतकऱ्यांना पावसाळ्यानंतर शेतीसाठी पाणी अडवता येणार असल्याने येथील शेतकऱ्यांना उन्हाळ्यासाठी शेतीला मुबलक पाणीसाठा करता येणार आहे. सुळे-आकुर्डे धरणाची गतवर्षापासून अतिशय दुरवस्था झाली होती. सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे आमदार पी. एन. पाटील व पाटबंधारे विभागाने या धरणासाठी तत्काळ २५ लाख निधी मंजूर करून काम पूर्णत्वास नेले. सुळे-आकुर्डे धरणालगत नवीन पुलासाठी पाच वर्षांपासून सतत पाठपुरावा सुरू असल्याचे पन्हाळा पं. स.च्या सदस्या रेखा बोगरे यांनी सांगितले.