मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात धुवॉंधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोकणामधील २३ गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विटद्वारे दिली आहे.

राजापूर येथील अर्जुना नदीला पूर आला असून, आसपासच्या गावांतील लोकांना सतर्क राहण्याच्या व सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोकण आणि गोव्यात देखील पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणाला पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा असल्याने तसेच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाण्यालाही यलो अलर्ट देण्यात आला. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही पावसाचा जोर वाढणार आहे.