कोल्हापूर, (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात बायोडिझेलच्या अनधिकृत विक्री विरोधात धडक मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व तहसिलदार व ऑईल कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

सद्यस्थितीत जिल्ह्यात आज अखेर एकही अधिकृत बायोडिझेल विक्रीचा परवाना देण्यात आलेला नाही. कुणी अवैधरित्या बायोडिझेल विक्री करीत असल्यास नागरिकांनी त्यांच्याकडून बायोडिझेल खरेदी करू नये. ज्या व्यक्ती बेकायदेशीररित्या अवैध बायोडिझल परवानाधारकाकडून, बायो डिझेल खरेदी-विक्री करुन वाहनात भरताना व इतर कामकाजासाठी वापरताना आढळून येतील त्यांच्यावर वाहनासह जीवनावश्यक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

अनधिकृत बायोडिझल विक्री करणा-यांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. अनधिकृत बायोडिझेल विक्री करणाऱ्यांबाबत जिल्ह्यातील नागरिकांना माहिती असल्यास त्यांनी संबंधित तहसिलदार अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कळवावे. संबंधितांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.