टोप (प्रतिनिधी) :  उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज (सोमवार)  महाविकास आघाडीने  महाराष्ट्र बंदची हाक दिली. नागांव, शिरोली येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून नागाव फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग काही  काळासाठी रोखून धरला. तर हालोंडी, शिये, मौजे वडगांवसह परिसरात या बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला. मात्र, यामध्ये मार्बल व्यवसायिक, हार्डवेअर, किराणामाल दुकानदारांची लाखांची उलाढाल ठप्प झाली.

आज नागांव, शिरोली आणि परिसरातील  महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी गावातून मोटरसायकल रॅली काढून गावातील सर्व व्यवहार बंद केले. त्यानंतर नागाव फाटा येथे येवून राष्ट्रीय महामार्ग काही काळ रोखून धरत केंद्र सरकार विरोधी घोषणा देवून निषेध व्यक्त केला.

शिरोली हे या परिसरातील मोठे गाव असल्याने आसपासच्या गावातील लोक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी येत असतात. तर कोरोनामुळे कित्येक दिवस ठप्प झालेली मार्बललाईन काही दिवसांपासून सुरु झाली होती. पण आज  सोमवार आठवड्याच्या  सुरूवातीलाच बंद झाल्याने व्यावसायिकांचे लाखांची उलाढाल  ठप्प झाली. या बंदला व्यावसायिकांनी व्यवसाय बंद करून प्रतिसाद दिला आहे.

यावेळी पं.स. सदस्य उत्तम सावंत, सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, जोतीराम पोर्लेकर, सरदार मुल्ला, रणजीत केळुस्कर, सुनिल सुतार, सुमित माळी, दिपक लंबे, किशोर शिंगे, भिकाजी सावंत, पदाधिकारी  उपस्थित होते.