दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर मोठा आरोप करत भाजप त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटलं आहे. अलीकडेच भाजपने दिल्लीतील 7 आमदारांशी संपर्क साधत काही दिवसांनी केजरीवाल यांना अटक करू. 21 आमदारांशी चर्चा झाली आहे. तुम्ही पण येऊ शकता. अशी ही माहिती दिल्ली आपच्या मंत्री आतिशी यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘ते दावा करतात की त्यांनी 21 आमदारांशी संपर्क साधला आहे पण आमच्या माहितीनुसार, त्यांनी आतापर्यंत फक्त 7 आमदारांशी संपर्क साधला आहे आणि त्या सर्वांनी नकार दिला आहे. याचा अर्थ असा आहे की, मला कोणत्याही घोटाळ्याच्या चौकशीसाठी अटक केली जात नसून ते दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडण्याचा कट रचत आहेत. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी आमचे सरकार पाडण्यासाठी अनेक कट रचले. मात्र त्यांना यश मिळाले नाही.

‘भाजपचे ऑपरेशन लोटस 2.0’

आप नेत्या आतिशी यांनीही पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोप केले. त्या म्हणाल्या की, भाजपला ऑपरेशन लोटस 2.0 करायचे आहे. यासाठी भाजपने 7 आपच्या 21 आमदारांशी बोलणी केली असून, प्रत्येक आमदाराला 25 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. केजरीवाल यांना अटक करून सरकार पाडणे हा त्यांचा उद्देश आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशातही त्यांनी असेच केले असल्याचा आरोप ही यावेळी करण्यात आला.