टोप (प्रतिनिधी) : महिला दिनाच्या दिवशीच तंटामुक्त समितीच्या उपाध्यक्ष आणि मुलांनी ग्रामपंचायतीच्या मागासवर्गीय महिला सदस्यांच्या घरावर हल्ला केला. या हल्लात सदस्यासह पती आणि मुलग्याला घरात घुसून जोरदार मारहाण केली. ग्रामपंचायतीने छापलेलेल्या जाहिरातीत महिला सदस्याच्या नावातील चुकीतून ही घटना घडली. या घटनेची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.

हातकणंगले तालुक्यातील नागांव येथील महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या जाहिरातीत या महिला सदस्याच्या नावापुढे तिच्या पती ऐवजी तिच्या मयत दिराचे नाव छापले होते. दिर मयत आहे हे माहित असताना देखील ग्रामपंचायतीच्या हालगर्जीपणामुळे नाव छापले गेले. पण, ही जाहिरात गावातील व्हॉट्स अँप ग्रुपवर नावात खाडाखोड फिरत असल्याने महिला सदस्याच्या पतीने संबंधित व्यक्तीला विचारणा केली. पण त्याने चुकून हा प्रकार घडला आहे असे सांगितले. परंतु, व्हॅटसअप ग्रुपवर मात्र ही चर्चा रंगू लागली होती. त्यामुळे गावात उलटसुलट चर्चेला तोंड फुटले.

या चर्चेचे रूपांतर घरात घुसून मारहाणी पर्यंत गेले. तंटामुक्त समिती उपाध्यक्ष आणि ही महिला सदस्य एकमेकांच्या शेजारीच राहत असल्याने उपाध्यक्षाने आपल्या नातेवाईकांना सोबत घेवून महिला सदस्यासह पती, मुलास मारहाण केली. यात पती व मुलगा जखमी झाले आहेत. महिला दिनादिवशी महिलेचा आदर करण्याऐवजी भरदिवसा घरात घुसून केलेली मारहाण ही कायद्याची पायमल्ली करणारी घटना ठरली आहे. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.