गारगोटी (प्रतिनिधी) : अथणी शुगर्सने अंतुर्ली ग्रामपंचायतीची २०१६ पासुनची तब्बल १ कोटी ६ लाख ४४ हजार रूपयांची कराची रक्कम थकवली आहे. याबाबत अंतुर्ली ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी अथणी शुगर्सला कराची रक्कम भरण्याच्या लेखी सुचना देऊनही त्यांनी दाद दिली नाही. ही रक्कम न दिल्याने आज (मंगळवार) अथणी शुगर्स युनीटकडे जाणारी सर्व ऊसाची वाहतूक ग्रामस्थांनी रोखून धरली.

यावेळी रामदास देसाई म्हणाले, ग्रामपंचायतीचा थकीत कर १ कोटी ६ लाख ४४ हजार रूपये द्यावा. यासाठी कारखान्याला वेळोवेळी नोटीस दिल्या आहेत. मात्र, अथणी शुगर्सने प्रत्येक वेळी टाळाटाळ करून कर थकविला असल्याचे सांगितले.भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव देसाई यांनी, कारखान्याला जमिनी दिलेल्या भूमीपुत्रांना हेल्परची वागणूक देऊन त्यांचा नोकरी सोडून जाण्यासाठी छळ केला जातो. दुसरीकडे कर्नाटकातील उच्चपदस्थ नेमून हुकूमशाही सुरु केली असल्याचे देसाई यांनी सांगितले.

यावेळी सरपंच प्रियंका जाधव, संदीप वरंडेकर, उपसरपंच आर. के. देसाई, दिनकर भुतल, सुमन देसाई, रेश्मा भुतल, सुनंदा जाधव, धनश्री कदम, प्रियंका पंदारे, बाबाजी देसाई, हरीदास देसाई, शशिकांत पाटील, प्रकाश तवटे, सुशांत ताम्हणेकर आदी उपस्थित होते.