मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने सध्या राज्यात सुरू असलेला लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला आहे. सरकारने यासंदर्भात आदेश काढला असून त्यानुसार सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर यासंदर्भातले संकेत दिले होते. त्यानुसार आज (गुरुवार) सायंकाळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आदेश जारी केला आहे. 

 

राज्यात १४ एप्रिलपासून सरकारने करोनाबाबतचे निर्बंध लागू केले होते. त्यामध्ये २२ एप्रिलपासून लॉकडाउनच्या कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला होता. आधीच्या आदेशांनुसार हे निर्बंध १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच लागू असणार होते. मात्र, राज्यातील रुग्णवाढीचा दर आणि मृतांची वाढतच जाणारी संख्या पाहाता लॉकडाउनमध्ये वाढ करण्याची भूमिका अनेकांनी मांडली होती. राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी देखील त्यासंदर्भात स्पष्ट मत मांडलं होतं. राजेश टोपे यांनी देखील बोलताना लॉकडाउन वाढवावाच लागेल अशीच राज्यातली परिस्थिती आहे, असं म्हटलं होतं. त्यानुसार आता राज्य सरकारने त्यासंदर्भात आदेश काढले आहेत.

लॉकडाउन वाढवण्यात आला असला, तरी त्यादरम्यान याआधीच १३ एप्रिल आणि २१ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेले निर्बंध लागू असतील, असं देखील राज्य सरकारकडून या आदेशांमध्ये जाहीर करण्यात आलं आहे.