मुंबई (प्रतिनिधी) : अर्थसंकल्पीय अधिवेशनात अन्वय नाईक प्रकरण  पुन्हा एकदा चर्चेत आले. देवेंद्र फडणवीस  यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले, असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. यानंतर फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टाचा दाखला देत गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग दाखल केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर  अन्वय नाईक  यांच्या पत्नी आणि मुलीने विरोधी पक्षाकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला.

अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक म्हणाली की, सुप्रीम कोर्टाचा निकाल नाही तर फक्त जामीन दिला आहे. लोकांची दिशाभूल करण्यात येत असून आमचा लढा अद्याप सुरु आहे.  आम्हाला अद्यापही धमक्या दिल्या जात आहेत, असे अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी सांगितले. अर्णब गोस्वामी जेलमधून बाहेर पडल्यावर सर्वांसमोर धमकी देत होता, आम्हाला दोन दिवस झोप लागली नाही, असे सांगून आमची केस दाबली गेली असून त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

आमच्यावर हात टाकण्यात आला होता. तेव्हाच्या तपास अधिकाऱ्याला कोणाचा आदेश होता, हेदेखील बाहेर काढावे. आम्ही संशय व्यक्त करत नसून सुसाईड नोटमध्ये नाव देण्यात आली आहेत. तपास अधिकाऱ्याला आमची चौकशी करण्याचा आदेश कोणी दिला होता? ज्यांना समस्या आहे त्यांनी चर्चेला बसावे. चाय पे चर्चा होऊन जाऊ द्या, असेही आव्हान आज्ञा नाईकने दिले. भाजप नेते  किरीट सोमय्यांचा जीव वर खाली का होतो?  असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.