आजरा (प्रतिनिधी) : गोकुळच्या निवडणुकीला अवघे दोन दिवस बाकी असताना आणखी एका ठरावधारकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  गडहिंग्लज तालुक्यातील शेंद्री येथील महालक्ष्मी दूध संस्थेचे ठरावधारक सज्जन विठोबा तोडकर (वय ७२) यांचे कोरोनामुळे निधन झाले.

तोडकर यांच्यावर  गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते.  गुरूवारी   त्यांची प्राणज्योत मावळली.  शेंद्री गावात त्यांनी सामाजिक व सहकार क्षेत्रात चांगले काम केले आहे.  त्यांनी गडहिंग्लज साखर कारखाना व आजरा साखर कारखान्यात शेती अधिकारी म्हणून सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शेंद्री गावात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, यापूर्वी गोकुळच्या दोन ठरावधारकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये आता आणखी एकाची भर पडली असून मृतांची संख्या तीन झाली आहे. त्यामुळे एकूण ३६५० ठरावधारकांपैकी ३ ठरावधारकांचा मृत्यू झाल्याने ठरावधारकांची संख्या ३६४७ इतकी झाली आहे. तर गोकुळचे ४० ते ५० ठरावधारक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी निर्धोक मतदान प्रक्रिया राबविण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.