कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनांअंतर्गत शहरातील सुधारीत नळपाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. हे काम निविदेनुसार होत नसून निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी महापालिकेवर वरात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी याबाबत महापालिका प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे अमृत योजनेचे काम निविदेनुसारच सुरू असल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे केला आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत कोल्हापूर शहर सुधारीत पाणी पुरवठा योजनेचे काम ठेकेदार दास ऑफशोअर इं.प्रा.लि. मुंबई, यांच्या नावे मंजूर असून कामाचा कार्यादेश दि. १ सप्टेंबर २०१८ रोजी देण्यात आला आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना महाराष्ट्र शासनाने प्राधिकृत केले असून, या संपूर्ण कामावरती अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. दिं.१८ सप्टेंबर २०२० रोजी मनसे जिल्हा अध्यक्षांनी रूईकर कॉलनी येथे प्रत्यक्ष काम सुरू असताना, बेडींगसाठी स्टीलची जाळी व काँक्रीट घालून पाईप जोडलेली नाही आणि पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत नाही. या कारणास्त्व सदरचे काम बंद पाडले.
याबाबत प्रत्यक्ष जागेवर योजनेचे सल्लागार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोल्हापूर महानगरपालिका आणि ठेकेदारांचे प्रतिनिधी, यांनी पहाणी केली. मंजूर योजना आणि निविदेनुसार पाईपलाईनच्या खाली स्टील जाळी व काँक्रीट घालण्याची तरतूद नसून त्याची गरजही नाही. सद्यस्थितीत सुरू असलेले काम हे मंजूर निविदेनुसार असल्याचे निदर्शनास आले. तसेच घालण्यात आलेल्या पाईपलाईनची जलदाब चाचणी घेतल्यानंतर आणि पाऊस कमी झाल्यानंतर मंजूर योजना आणि निविदेनुसार पाईपलाईनच्या खुदाईच्या रूंदीने रस्ता पूनर्पृष्ठीकरणाचे काम हाती घेऊन पुर्ण करण्यात येणार आहे. अशी अमृत योजनेच्या कामाची वस्तुस्थिती असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आरोपामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य दिसून येत नाही.