मुंबई – सध्या राज्यात लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते आपली आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे. अशातच पवार – पवार कुटुंबियामधील वार प्रतिवार थांबायचे नाव घेत नाहीय . माजी कृषिमंत्री शरद पवारांना एक वक्तव्य गळ्याशी आल्याचं पाहायला मिळत आहे.काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना ‘बाहेरचा पवार’ असे संबोधलं होत. परंतु काल आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचं स्पष्ट केलं. आपण तसं बोललोच नाही, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं होत आता माजी कृषिमंत्री शरद पवारांच्या ‘बाहेरच्या पवार’ वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पलटवार केला आहे. 4 दिवस सासूचे संपले, आता सुनेचे 4 दिवस येऊद्या, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. 40 वर्ष झाली तरी बाहेरचे म्हणत आहेत, असाही जोरदार टोला अजित पवारांनी शरद पवार यांना लगावला आहे.

काय म्हणाले अजित पवार..?

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , “ही वडीलधारी जरा, जुना काळ आठवत असेल, तर त्यांना म्हणा, जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा. आता नवीन काळ बघा. आता सासूचे चार दिवस संपले, आता सूनेचे चार दिवस येऊद्या, असं सांगाना. की फक्त सासू-सासू-सासू, मग सुनेनं फक्त बघत बसायचं? बाहेरची-बाहेरची-बाहेरची, असं कुठं असतं का राव? असतं का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो. 40 वर्षे झाली तरी बाहेरची? किती वर्ष झाले मग घरची? सांगा आई बहिणीनों, बघा बाबा आता” अशा शब्दांत अजित पवारांनी शरद पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आता यावर माजी कृषीमंत्री शरद पवार काय प्रतिउत्तर देतात हे पाहने म्हत्वाच असणार आहे.