कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शिवसेना उद्धव ठाकरे गट कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडामोडी सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या शिवसैनिकांची बैठक मातोश्रीवर झाली होती. यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा मा. खासदार राजू शेट्टी यांनी उद्धवसेनेतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.

यानंतर मुरलीधर जाधव यांनी केलेले आरोप हे सर्व पाहता सुंदोपसुंदीला ही उधान आल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान ते लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने ही काही भाष्य करणार का ? असा सवाल केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे आज दिनांक 9 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता कोल्हापुरात दाखल होणार आहेत. सायंकाळी 4 च्या सुमारास ते श्री क्षेत्र आदमापूर येथे श्री संत बाळूमामांचे दर्शन घेतील. यानंतर संध्याकाळी 6 वाजता गारगोटी येथील हुतात्मा चौकात त्यांची सभा पार पडणार आहे. तर संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास कोल्हापूर शहरात मिरजकर तिकटी येथे त्यांची दुसरी सभा होणार आहे.

तर 10 जानेवारी रोजी आदित्य ठाकरे यांची तिसरी सभा हुपरी ( हातकणंगले लोकसभा मतदारसंघ ) यशवंत मंगल कार्यालय येथे दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. या दरम्यान ते पक्षातील खलबते अन् लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाष्य करतीच त्याच बरोबर अंतर्गत घडामोडींवर भाष्य करणार का ? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.