कोल्हापूर (प्रतिनिधी) : सौर यंत्रणेचे प्रकरण मंजूर करून देण्यासाठी सहा हजार रूपयांची लाच कार्यालयामध्ये स्वीकारताना उत्तर विभाग महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता आबासाहेब परशराम मांडके  (वय ५२, रा. एसटी कॉलनीजवळ, ताराबाई पार्क) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदाराने आपल्या वडीलांचे सौर यंत्रणा विक्री आणि दुरूस्तीचे दुकान आहे. एका ग्राहकाच्या घरी १० किलोवॅटची सौर यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांची मंजुरी आवश्यक होती. त्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी ग्राहकाच्या नावने रितसर अर्ज उत्तर उपविभाग, नागाळा पार्क येथील महावितरणच्या कार्यालयात दिला. संबंधित अतिरिक्त कार्यकारी अभियंता मांडके यांची भेट घेवून सौर यंत्रणेसाठी आवश्यक असलेल्या १० किलोवॅट वीजेबाबत तक्रारदाराने चर्चा केली.

त्यावेळी मांडके यांनी तक्रारदाराला प्रकरण मंजूर करून देण्यासाठी प्रत्येक १ किलोवॅट करिता ६०० रूपये याप्रमाणे १० किलोवॅटचे ६ हजार रूपये द्यावे लागतील तरच मी तुमचे काम मंजूर करून देईन, नाहीतर देणार नाही, असे सांगितले. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयामध्ये शासकीय पंच आणि साक्षीदारांच्या समक्ष पडताळणी केली असता पडताळणीमध्ये ६ हजार रूपये लाच मांडके याने मागितल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उप अधीक्षक अदिनाथ बुधवंत, सहाय्यक फौजदार शाम बुचडे, हवालदार अजय चव्हाण, पो.कॉ. मयुर देसाई, रूपेश माने, संदिप पडवळ, चालक विष्णू गुरव यांच्या पथकाने केले.