कोल्हापूर (प्रतिनिधी) : अमृत योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांची आणि एसटीपीची पाहणी आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आज केली. तर ही कामे तातडीने पुर्ण करावीत, असे आदेश त्यांनी दिले.

आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे या हजर झाल्यापासून दैंनदिन विविध विभागाचा आढावा घेत आहेत. आज सकाळी आयुक्त कार्यालयामध्ये पाणी पुरवठा विभागाचा आढावा त्यांनी घेतला. यानंतर दुपारी ३ वाजता कसबा बावडा येथील  अमृत योजनेअंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा केंद्र आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र, ताराबाई पार्क येथील पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे काम, दुधाळी येथील १७ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्र व अमृत योजनेअंतर्गत दुधाळी येथे  ६ एमएलडीचा नविन बांधण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी अमृत योजना लवकरात लवकर वेळेत पुर्ण करण्याच्या सुचना ठेकेदार यांना दिल्या. सध्या काम संथगतीने सुरु असलेने कामाला गती द्या अशा सुचनाही केल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता भास्कर कुंभार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपजल अभियंता डी.के.पाटील, प्रभाकर गायकवाड, कनिष्ठ अभियंता आर के पाटील, दास ऑफशोरचे ठेकेदार किर्तीकुमार भोजक, लक्ष्मी इंजिनिअरचे मॅनेजर संजय कदम आदी उपस्थित होते.