कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील साखर कारखानदार हंगाम सुरू करण्याची तयारी करीत आहेत. पण त्यांना यंदा अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कोरोनामुळे ऊस तोड करणाऱ्या मजुरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कायद्यानुसार एकरकमी एफआरपी द्यावी लागणार आहे. याच मुद्दयावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखादारांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. यातून मार्ग काढून कारखानदारांना हंगाम सुरू करावे लागणार आहे. 

प्रत्येक वर्षी जयसिंगपूर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषदेमध्ये उसाचा दर ठरल्यानंतर साखर कारखान्यांची धुराडी पेटतात. यंदा कोरोनामुळे ऊस परिषद होणार नाही, अशी शक्यता गृहीत धरून अनेक साखर कारखानदारांनी हंगाम सुरू करण्याची तयारी करीत आहेत. पण स्वाभिमानीचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी यंदा कोणत्याही परिस्थितीमध्ये ऊस परिषद होईल, परिषदेमध्ये ठरलेला दर कारखानदारांना द्यावाच लागेल, अन्यथा धुराडे पेटणार नाहीत, असा इशारा दिला आहे. परिणामी कारखानदार सावध झाले आहेत.

जिल्हयातील वारणा कारखान्याने गेल्या वर्षातील एफआरपीची संपूर्ण रक्कम उत्पादकांना दिलेली नाही. या कारखान्यावर साखर जप्तीच्या कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित बहुतांशी साखर कारखानदार एकरकमी एफआरपी देता येणार नाही. म्हणून एफआरपीचे तुकडे करण्यासाठी उत्पादकांकडून संमती पत्रे भरून घेत आहेत. याला शेतकरी संघटनांचा विरोध आहे. यावर अद्याप कारखानदार जाहीर भूमिका मांडण्यास पुढे आलेले नाहीत. गत हंगामातील साखर निर्यातीचे अनुदान अजून केंद्र सरकारकडून देय आहे ते मिळावे, अशी कारखानदारांची मागणी आहे. इथेनॉल दरवाढीकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अशा अनेक अडचणी असल्या तरी अधिकाधिक ऊस गाळप करण्याचे नियोजन सर्वच साखर कारखानदार करताना दिसत आहे.