*दोन तास अभ्यासासाठी,देगाव ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम*
पंढरपूर प्रतिनिधी:
पंढरपूर तालुक्यातील सतत चर्चेत असणारी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या देगाव ग्रामपंचायतीच्या वतीने तालुक्यात प्रथमच अभ्यासासाठी दोन तास हा उपक्रम राबवला जात आहे. सायंकाळी ६ ते ८ दरम्यान संपूर्ण गावात टीव्ही व मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. 
अभ्यासासाठी दोन तास या अनोख्या प्रयोगांतर्गत संपूर्ण देगाव गावात देगाव ग्रामपंचायतीच्यावतीने सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान मोबाईल बंदी तसेच टीव्ही बंदीची घोषणा करण्यात आली आहे.या दोन तासाच्या वेळेत मुलांकडून केवळ अभ्यासच करून घेतला जात असून गेल्या दोन दिवसांपासून देगाव गावात हा नावीन्यपूर्ण उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबवला जात आहे.
कोरोना काळामध्ये सरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंबली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन देऊन शिक्षण शिकवले जात होते.परंतु  याचा विपरीत परिणाम सध्या विद्यार्थ्यांवर होऊ लागला होता. मोबाईल व टीव्हीचा अतिरिक्त वापर होऊ लागल्याने विद्यार्थी पुस्तकाकडे दुर्लक्ष करू लागले आहेत तसेच त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे.त्यामुळे देगाव ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच तसेच सदस्य व गावकऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालिका दिन जिल्हा परिषद शाळेत साजरा करत या नाविन्यपूर्ण उपक्रमाची घोषणा केली आहे.परवापासून संध्याकाळी सहा ते आठ या दोन तासाच्या दरम्यान गावामध्ये सायरन वाजवला जातो.त्यांनतर ग्रामपंचायत मधील शिपाई दवंडी देऊन आवाहन करतात व गावातील सर्व घरामध्ये टीव्ही व मोबाईल दोन तास बंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या दोन तासाच्या कालावधीमध्ये पालकांनी विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घ्यावयाचा आहे.
यादरम्यान घरोघरी जाऊन सरपंच,उपसरपंच तसेच ग्राम पंचायत सदस्य,ग्रामपंचायतमधील शिपाई पाहणी करतात. मुलं अभ्यास करतात की नाही,घरातील टीव्ही बंद आहे का नाही? ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी जर नाही झाली तर एक हजार रुपयांचा दंड ग्रामपंचायतीद्वारा त्या घरावर आकारण्यात येईल असे देगाव ग्रामपंचायत सरपंच सौ सीमा संजय घाडगे यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की उपक्रमामुळे मोबाईल टीव्ही च्या आहारी गेलेले विद्यार्थी व पालक पुन्हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे वळतील व तालुक्यातील सर्व ग्रामपंचातीनी असा उपक्रम राबवावा असेही त्यांनी आवाहन केले. या स्तुत्य उपक्रमामुळे गावातील नागरिक, शिक्षक,पालक,विद्यार्थी यांनी स्वागत करत आम्ही या ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या वेळेत दोन तास आपल्या घरातील टीव्ही व मोबाईल बंद ठेवून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास भाग पाडू असे सांगितले. यावेळी देगावचे सरपंच सौ सीमा संजय घाडगे, श्री संजय घाडगे, ग्रामपंचायत सदस्य समीर शेख, समाधान घाडगे, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणेश लेंडवे, मुख्याध्यापक श्री कुलकर्णी , गुरसाळकर मॅडम, वाघमारे मॅडम, कुलकर्णी मॅडम, पाटोळे सर, आप्पा ढेरे आदी उपस्थित होते.