पन्हाळा (प्रतिनिधी) : ऐतिहासिक पन्हाळगडावरील मुख्य प्रवेशद्वारानजीक चार दरवाजा येथील सादोबा तलावाची भिंत गेले दोन-तीन दिवस सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे बुधवार सकाळी ११.३० वाजता कोसळली.

पूर्वीच्या काळी सादोबा तलावाजवळील मोटवाणीचा वापर पाणी खेचण्यासाठी करण्यात येत असे. जवळपास ४० ते ५० फूट उंच अशी ह्या मोटवाणीची भिंत आहे. मागील वर्षी देखील सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे तलावाची संरक्षक  भिंत कोसळली होती.

स्थानिकांनी याचा पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतलेली नाही. वेळोवेळी सर्वांना निवेदन देऊन देखील प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. पुरातन वास्तूचे जतन व संवर्धन केले नाही तर अशा ऐतिहासिक वस्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तरी या तलावाची लवकरात लवकर डागडुजी व्हावी, अशी मागणी नियाज मुल्ला, इम्तियाज मुजावर, अमित जगताप, अकिब आगा, मासूम गार्दी यांनी केली.