कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेच्या जागेत भुई-भाड्याने राहत असलेल्या नागरिकांना मुख्याधिकार्‍यांनी नोटीस बजावली आहे. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून नागरिकांचे वास्तव्य असून तिसरी पिढी या जागेत वास्तव्य करत आहे. तरी मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटिसीला व कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यावर प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांना तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.

शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे म्हणाले की, कुरुंदवाड शहरातील गोठणपूर, मटन मार्केट, पाण्याची टाकी, मोमीन गल्ली व तळेवाडी येथील पालिकेच्या मालकीच्या सि.स.क्र पैकी. 478 ,357, 3102 सहआदि क्रमांकाच्या भूखंडावर शासन अधिनियम 1965 कलमान्वये 92 नुसार व मालमत्ता हस्तांतरण नियम 1983 नुसार 50 वर्षापूर्वीपासून भाडेपट्टयाने दिल्या आहेत. येथे विनातक्रार आजपर्यंत वास्तव्य आहे. भुई-भाडेपट्टयाची मुदत संपल्याने पालिकेने जागा ताब्यात देण्याबाबत 563 कुटुंबधारकांना नोटीसा दिल्या आहेत. त्यामुळे 3500 नागरीक बेघर होणार आहेत. तरी यावर उपाययोजना करून नागरिकांना बेघर होण्यापासून वाचवावे.

यावेळी कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे, अनिल लाड, बाबासाहेब गावडे, शहारूख गरगरे, मोहन बागडी, रविंद्र बागड़ी, सुनिल भुई, विलास साळुंखे, महंमद-साद बागवान, विनायक बागडी, बेबीताई भुई, नामदेव भुई, जैबुन शेख, विमल भुई, प्रकाश भुई, पोपट बागडी आदी उपस्थित होते.