कोल्हापूर (प्रतिनिधी) :  रंकाळा तलावातील पाण्यात धुण्यासाठी नेलेल्या पाच म्हैशी पाण्यात भरकटल्या. मालकाच्या हाकेला साद न देता त्या पाण्याबाहेर येण्याऐवजी पुढे-पुढे जात राहिल्या. त्यामुळे या म्हशींचा मालक हवालदिल झाला. त्याने शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बोटीच्या सहाय्याने या म्हशींना तलावाबाहेर येण्यासाठीची वाट दाखवली. तसेच बोटींचा वापर करत या म्हैशींना सांडव्याकडील बाजूने बाहेर काढले.

कोल्हापुरात पंचगंगा नदी आणि रंकाळा बचाव मोहीम राबवली जात आहे. पाण्यात कपडे धुणे, गणेशमूर्ती विसर्जन आणि निर्माल्य टाकण्यासही बंदी आहे; मात्र हा आदेश धाब्यावर बसवून पाण्यात जनावरे धुणे सुरूच असते. आज (शुक्रवार) सकाळी राजकपूर पुतळ्यासमोरच्या बाजूला पाच म्हशी रंकाळ्यात डुंबत होत्या. पण यावेळी मालकाचे दुर्लक्ष झाल्याने या म्हशी बाहेर येण्याऐवजी त्या राजघाटाच्या दिशेने गेल्या. पुढे गेल्यावर मात्र म्हशींना बाहेर येण्याचा मार्ग समजेना. त्यामुळे मालकाने अग्निशामक दलाला पाचारण केले.

मात्र, रंकाळ्यातील केंदाळामुळे मोटरबोट म्हशींपर्यंत नेणे अशक्‍य झाले. शेवटी वल्ह्याच्या बोटींनी म्हशींना बाहेरच्या बाजूला हाकलले. या मोहिमेत अग्निशमनच्या चेतन जानवेकर, प्रणित ब्रह्मदंडे, अक्षय पाटील, संजय माने, सुरेश मर्दाने, सुनील वायदंडे यांनी सहभाग घेतला.