मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा १२ डिसेंबरला ८० वा वाढदिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्या वाढदिवसाची जंगी तयारी सुरू आहे. वाढदिवसाच्या दिवशी ८० हजार तरुणांना रोजगार देणार असल्याची घोषणा राज्याचे कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

ते म्हणाले, वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्याच्या कौशल्य विकास विभागातर्फे ऑनलाईन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ८० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी ७ ते १२ डिसेंबर २०२० पर्यंत rojgar.mahaswayam.gov.in आणि yodhaat80.org या दोन संकेतस्थळावर नोकरी देणारे आणि नोकरी हवी असणारे लोक नोंदणी करू शकतात. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते देखील जिल्हा स्तरावर नोंदणी करण्याचा उपक्रम राबविणार आहेत. त्यानंतर १२ आणि १३ डिसेंबरला ऑनलाईन मुलाखतीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी दिल्या जातील. ७ डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी २१४ कंपन्यांनी उपक्रमामध्ये नोंदणी केली आहे. ८० हजार तरुणांना रोजगार दिला जाईल. पण हा आकडा आणखी जास्त वाढण्याची शक्यता आहे. कारण, कंपन्यांची मागणी अधिक असल्यामुळे हा आकडा एक लाखाच्यावरही जाऊ शकतो.