कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्याविषयी मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाच्या वतीने राज्यभर आक्रमक आंदोलने सुरू आहेत. काही जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोरही आंदोलने केली जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आग्रही आहे.
यासाठी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकावे यासाठी गट-तट व पक्षभेद विसरून महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आत्तापर्यंत २१ खासदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे. लवकरच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी निवेदन देणार आहेत. खा. संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे भेटीची मागणी केली आहे.
तर खा. सुभाष भामरे, धुळे (माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री), खा. राजन विचारे (ठाणे), खा. प्रतापराव पाटील-चिखलीकर (नांदेड), खा. हेमंत पाटील (हिंगोली), खा. संजय मंडलिक (कोल्हापूर), खा. सदाशिव लोखंडे (शिर्डी), खा. संजय पाटील (सांगली), खा. श्रीरंग बारणे (मावळ), खा. हेमंत गोडसे (नाशिक), खा. डॉ. श्रीकांत शिंदे (कल्याण), खा. धैर्यशील माने (हातकणंगले), खा. नवनीत कौर राणा (अमरावती), खा. राहूल शेवाळे (दादर), खा. प्रतापराव जाधव (बुलढाणा), खा. ओमराजे निंबाळकर (धाराशिव), खा. डॉ. भारती पवार (दिंडोरी), खा. हिना गावित (नंदुरबार), खा. रक्षा खडसे (रावेर), खा. डॉ. प्रितम मुंडे (बीड), डॉ.खा.सुजय विखे पाटील (नगर), खा. उन्मेष पाटील (जळगाव) या खासदारांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे.