पुणे (प्रतिनिधी) : दहावी आणि बारावीच्या परीक्षा या जुन्याच पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे. कोविड काळात विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सवलती रद्द करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला असून, २०२३ ची बोर्डाची परीक्षा ही १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

मार्च २०२० पासून आलेल्या कोरोना संकटामुळे १० वी आणि १२ वीच्या परीक्षा पद्धतीत राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने थोडे बदल करुन विद्यार्थ्यांना काही सवलती दिल्या होत्या. या सर्व सवलती रद्द करुन संपूर्णपणे १०० टक्के अभ्यासक्रमावर २०२३ च्या बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

कोरोना काळात ऑनलाईन शाळा सुरू असल्याने तसेच शाळेपासून दूर राहणा-या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाने २०२२ च्या बोर्डाच्या परीक्षा शाळा तिथे परीक्षा केंद्र तसेच परीक्षेसाठी वाढीव वेळ, अभ्यासक्रमात कपात अशा सवलती १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. या सर्व सवलती रद्द करुन, पूर्वीच्याच पद्धतीने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.